श्रीधर फडके यांचे नाव न ऐकलेला मराठी माणूस सापडणे ही गोष्ट अशक्यच आहे. सॅन डिएगोच्या रसिक श्रोत्यांना आत्तापर्यंत २-३ वेळा तरी त्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे. श्रीधरजींनी अनेक लोकप्रिय चित्रपटांना आणि गीत संग्रहांना संगीत दिले आहे. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये मात्र रसिकांना श्रीधरजींकडून नविन संगीत ऐकायला मिळाले नव्हते. त्यामुळेच त्यांचा नविन गीतसंग्रह येतो आहे ही बातमी मिळाल्यावर ते रसिकश्रोते त्याची आतूरतेने वाट पहात होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच २४ ऑक्टोबर ला तोच मी हा गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. अतिशय सुमधुर आणि आशययुक्त अश्या ९ गाण्याच्या या पुष्पगुच्छाची रसिकांना जणू भेटच मिळाली. त्यामधील गाण्यांबद्दल हा एक छोटासा लेख!
तोच मी
"तोच मी" ही कवी सुरेश भटांची कविता श्रीधरजींनी वाचली होती. अप्रतिम अश्या या कवितेच्या फक्त चार ओळीच सुरेशजींनी लिहिल्या आहेत –
तू कधी वेणीत फूल खोवतेस ना? तोच मी!
अन् कधी गोऱ्या हातांना मेंदी लावतेस ना? तोच मी!
तू कधी डोळ्यात काजळ घालतेस ना? तोच मी!
आणि न्हाल्यावर दरवळतेस ना? तोच मी!
या ओळींची श्रीधरजींनी यमन रागात चाल बांधली आणि पूर्ण गाणे बनवण्यासाठी युवा कवी मंदार चोळकर यांच्याकडून काही अंतरे लिहून घेतले. त्यामधील दोन अंतरे या गाण्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि खरोखरच या गाण्यात सुरेशजी कुठे थांबतात आणि मंदारजी कुठे सुरू होतात तेच कळत नाही. या गीताची हळूवार अशी चाल श्रीधरजी स्वत:च गायले आहेत. गाण्यातल्या "तोSSच" या शब्दामध्ये श्रीधरजींनी स्वरांचा जो प्रवास घडवला आहे तो खुपच छान आहे.
रमेना गमेना
श्रीधजींनी हे गाणे खरे तर प्रविण दवण्यांकडून आशाताई भोसले यांच्याबरोबरच्या एका गीतसंग्रहासाठी बनवलेल्या चालीसाठी लिहुन घेतले होते. पण काही कारणाने त्यावेळी हे गाणे या संग्रहामध्ये समाविष्ट करता आले नव्हते. तब्बल दहा वर्षांनंतर श्रीधरजींनी हे गाणे आता आर्या आंबेकरच्या आवाजात आपल्या समोर आणले आहे. आर्याने हे गाणे कमालीचे गायले आहे आणि ते ऐकल्यावर श्रोत्यांना नक्कीच आशाताईंची आठवण येते.
मंत्र हा स्मरून घे
हे गाणेही प्रविण दवण्यांच्याच लेखणीतून उतरले आहे. नविन आव्हाने पेलण्यासाठी आपणाला जागे करणारे आणि स्फूर्ती देणारे असे हे गीत आहे. सैन्याच्या कवायतीच्या तालावर (foxtrot) असणारे हे गाणे श्रीधरजींनी स्वत: खूपच सुंदर गायले आहे.
दिवसा ढवळ्या प्राण सखा
ही कविता म्हणजे गदिमांनी लिहिलेले एक अपूर्ण लोकगीत आहे. श्रीधरजींनी त्याच्या पुढच्या ओळी शांताबाई शेळके यांच्याकडून लिहून घेतल्या. लहानपणी अनुभवलेली बैलगाडीची सफर, ढवळ्या आणि पवळ्या यांच्या घुंगरांचे आवाज, शेतं, औत अशी सगळी स्म्रुतीचिन्हे आपल्याला पुन्हा एकदा जुन्या दिवसांच्या आठवणीत घेऊन जातात. मधुरा दातार यांनी हे गाण्ं अस्सल गावरानी ठसक्यात गायलं आहे!
दारी टक टक
अवखळ अश्या शब्दांची ही लावणी प्रविण दवण्यांनी श्रीधरजींच्या चालीवर लिहीली आहे. अस्सल लोकगीतांची लक्षणे — म्हणजे साधे सोप्पे बोलीभाषेतले शब्द, "अय्या", "इश्श"
असे उद्गार, ढोलकी आणि बाजापेटीची संगत, गायिकेबरोबर समूहगायकांच्या (chorus) शब्दांची पेरणी — हे सर्व या गाण्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. लावणीचा हा गोडवा आपल्यापर्यंत पोचवला आहे तो शरयू दाते यांनी.
दिडदा दिडदा
या गाण्याचीही चाल श्रीधरजींना आधी सुचली आणि त्यावेळी त्यामध्ये "दिडदा दिडदा"असे शब्द (dummy words) त्यांच्या मनात आले. कदाचित केशवसुतांची "सतारीचे बोल" ही कविता त्यांना स्मरली असावी! त्या चालीवर आणि "दिडदा दिडदा" या शब्दांना घेऊन संदीप खरे यांनी हे गाणे रचले. हे गाणेही शरयू दाते यांनीच गायले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात खूप सतारींचा वापर केलेला आहे.
(गंमत म्हणजे - बा. भ. बोरकर यांचीही एक कविता आहे ज्यामध्ये "दिडदा दिडदा" असे शब्द आहेत. त्या कवितेचे शीर्षक काय असेल बरे? विचित्र वीणा!)
षड्ज ज्याच्या कंठातून
प्रविण दवण्यांचा "आर्ताचे लेणे" हा एक सुप्रसिद्ध काव्यसंग्रह आहे ज्यामध्ये ही सुंदर कविता आहे — "षड्ज ज्याच्या कंठातून मैफीलीत मोहरे, त्याचेच रे गाणे खरे!" या कवितेला शास्त्रीय संगीतावर आधारित अश्या या सुंदर चालीमध्ये श्रीधरजींनी बांधून अजरामर केले आहे. शिल्पा पुणतांबेकर आणि श्रुती विश्वकर्मा यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्यामधील आलाप आणि ताना त्या दोघींनी खूपच सहजपणे घेतल्या आहेत.
तर असा हा सर्वांगसुंदर गीतसंग्रह आपल्याला Youtube, Soundcloud वर ऐकता येईल आणि नीलम ऑडियो आणि व्हिडीओ यांच्याकडून विकतही घेता येईल. रसिकांनी अश्या अभिजात संगीताला जरूर प्रोत्साहन द्यावे हीच विनंती!